Tuesday 3 June 2014

कोंबडी पालनाने महिला बनल्या स्वावलंबी

कोंबडी पालनाने महिला बनल्या स्वावलंबी








कुकूटपालन हा तसा पारंपरिक व्यवसाय! भारताची आर्थिक नाडी जशी कृषीवर आधारित आहे. तशी ग्रामीण भागात कृषीपूरक जोड म्हणून कुकूट पालन व्यवसायावर ग्रामजीवनाची आर्थिक नाडी बेतलेली असते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनी ब्राम्हणवाडीत देशी कोंबडी पालनाचा प्रकल्प राबवून तेथील महिलांना आर्थिक रोजगार मिळवून दिला आहे. ब्राम्हणवाडीतील या महिला आता आर्थिक स्वावलंबी बनल्या आहेत.
देशी कोंबडयांना व त्यांच्या अंड्यांना ग्राहकांकडून अतिशय चांगली मागणी असल्याचे दिसून येते. सातारा जिल्ह्यात परसबागेतील देशी कोंबडीपालनास चालन देण्याच्या दृष्टीने आत्मा सातारने लाभार्थी महिलांशी चर्चा करुन हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारच्या प्राप्त अनुदानातून राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. प्रकल्पामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिके याबाबींचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पामध्ये प्रशिक्षण या बाबीवर विशेष भर देण्यात आला. जेणेकरुन अशा स्वरुपाच्या नवीन विषयाबाबत महिलांना सांगोपांग माहिती मिळेल. प्रशिक्षणासाठी या महिलांना गोंदवले ता. माण, जि. सातारा येथील विवेक फडतरे यांच्या देशी कोंबडी पालन प्रकल्पांच्या ठिकाणी नेण्यात आले व त्या ठिकाणी त्यांना देशी कोंबड्यांच्या संगोपनाबाबत दि.5 सप्टेंबर, 2013 रोजी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. 

एक दिवसीय प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना पिलांचे संगोपन, कोंबडी खाद्य तयार करणे, कोंबड्यांची देखभाल व निगा राखणे, प्रथमोपचार इ. बाबत सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी 25 महिलांना प्रात्यक्षिक स्वरुपात दोन आठवडे वयाची देशी कोंबडीची पिले प्रत्येकी 50 देण्याचे नियोजन करण्यात आले. तथापि पिलांच्या सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीत ती लहान असल्यामुळे त्यांना मांजर, घार, कुत्रा इ. प्राण्यांपासून असलेला धोका विचारात घेवून संरक्षणासाठी लोखंडी खुराड्यांची गरज असल्याचे लक्षात आले. गावच्या कृषी सहायक रोहिणी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी स्थानिक कारागिराकडून लोखंडी खुराडी तयार करुन घेतली. या खुराड्यांना आकारमान 5 फूट, 2.5 फूट रुंद व 3.5 फूट उंच अशा प्रकारचे आहे. अशा खुराड्यासाठी प्रत्येकी 2 हजार 800 इतका खर्च आला व तो सहभागी महिलांनी केला.

लाभार्थी महिलांना दोन आठवडे वयाची व लसीकरण पूर्ण झालेली पिले दि.16 सप्टेंबर, 2013 रोजी प्रत्येकी 50 या प्रमाणे देण्यात आली. पिले दिल्या दिल्या त्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून प्रत्येक लाभार्थीस 25 किलो पिलांचे खाद्य (chick mash) देण्यात आले. तद्नंतर खाद्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महिलांना स्थानिक पद्धतीने मका, गहू, ज्वारी, बाजरी इ. धान्याचा उपयोग करुन खाद्य तयार करण्याबाबत पंचायत समिती सातारा येथील पशुधन विकास अधिकारी रुपाली अभंग यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. 

सहभागी सर्व महिलांचे बँकेत बचत खाते उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. 25 महिलांपैकी 10 महिलांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव ता. सातारा या शाखेत नव्याने उघडण्यात आले. राहिलेल्या 5 महिला ऊस तोडीच्या कामासाठी बाहेरगावी असल्याकारणाने ते परत येताच त्यांचे खाते घडण्यात येणार आहे.

महिलांनी पिलांचे संगोपन काळजीपूर्वक केल्यान मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले. प्रकल्पास आत्मा सातारा, कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी सातत्यान भेटी देवून महिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 3 महिन्यांच्या कालावधीत पिलांचे सरासरी वजन दीड किलो झाले. या प्रकल्पास राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी दि.5 डिसेंबर, 2013 रोजी भेट देवून पहाणी केली. यावेळी त्यांनी हा प्रकल्प अतिशय उत्कृष्टपणे राबविला असल्याबाबत अभिप्राय दिले. तसेच प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व महिलांचे अभिनंदन कले. अशा प्रकारचे नियोजनबद्ध व नाविण्यपूर्ण प्रयोग इतर ठिकाणी राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रकल्पातून अपेक्षित लाभ : या प्रकल्पातून प्रत्येकी सहभागी लाभार्थी महिलेस 50 पिले दिलेली आहेत. प्रकल्पांत लाभार्थी प्रशिक्षण या बाबीवर रक्कम 10 हजार व प्रात्यक्षिके (दोन आठवडे वयाची 50 पिले व 25 किलो खाद्य) या बाबीवर रक्कम 54 हजार 375 असा एकूण रक्कम रुपये 64 हजार 375 इतका खर्च झाला आहे. प्रकल्प अंमलबजावणीस सुरुवात झाल्यापासून 5 महिन्यानंतर प्रत्येक महिलेस सरासरी 4 हजार प्रती महिना इतकी आर्थिक प्राप्ती होणे अपेक्षित आहे. म्हणजेच प्रती महिना सर्व लाभार्थींना सुमारे 1 लाख व वार्षिक सुमारे 12 लाख इतक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. 

मी सौ. माया संतोष कदम, रा. ब्राम्हणवाडी, ता. सातारा येथील महिला शेतकरी आहे. मी माझ्या घरकामांचा निपटारा करुन अधिकाधिक वेळ शेतात राबत असते. रोजचा दिवस शेतीकामात जातो. परंतु अपेक्षेप्रमाणे उत्पादन माझ्या हाती येत नव्हते. आमच्या गावात कृषी सहायक रोहिणी जोशी यांनी आत्मा अंतर्गत कुकूटपालन प्रकल्पाची माहिती सांगितली म्हणून मी व माझ्या बचत गटातील महिलांनी यात सहभाग घेतला.

जोडधंदा म्हणून हा प्रकल्प अतिशय उत्तम आहे. देशी कोंबड्याचे संगोपनदेखील यामुळे होत आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून आमचा आर्थिक फायदा होणार आहे. यामध्ये आम्हाला आत्मा सातारा यांच्यामार्फत विविध अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे खात्री पटली व आत्मविश्वास वाढला की हा प्रकल्प आम्हास निश्चितपणे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणारा आहे.

एकूणच काय ग्रामीण भागातील महिलांचे आत्माच्यावतीने आता सक्षमीकरण करण्यात येत असून देशी कोंबड्यांचे गाव ब्राम्हणवाडी अशी नवी ओळख निश्चितपणे बनेल यात शंका नाही.


Source- Mahanews
Share This

No comments:

Post a Comment